📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
राजकीय

स्व. अजितदादांच्या कार्याचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही: आमदार सचिन पाटील

👤 फलटण प्रतिनिधी    📍 फलटण    🗓 22 Jul 2026 08:34 PM    👁 64 Views    ⏱️ 4 मिनिटे वाचन
स्व. अजितदादांच्या कार्याचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही: आमदार सचिन पाटील

📷 फोटो गॅलरी

फलटण (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने फलटण तालुक्यात आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 'सेवा सप्ताह' मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच आज (बुधवार, २२ जुलै २०२६) सामाजिक भान जपणारे विविध उपक्रम राबवून स्व. अजितदादांना अभिवादन करण्यात आले.
आज फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील रुग्णांना फळवाटप, जिंती नाका येथील नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच मंगळवार पेठ परिसरात वृक्षारोपण आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवा पार पडली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सचिन पाटील भावूक झाले. ते म्हणाले, "लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करताना मनात अत्यंत दुःख होत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि एकूणच विकासात स्व. अजितदादांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा जेव्हा राज्याच्या विकासावर चर्चा होईल, तेव्हा स्व. दादांचे स्मरण सदैव राहील. एक कार्यकर्ते म्हणून त्यांचा हा समृद्ध विकासवारसा पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." तसेच या सेवा सप्ताहात पुढेही विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, ज्येष्ठ नेते डी. के. अण्णा पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, युवक मोर्चा अध्यक्ष अतुल शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या