📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
ग्रामीण

मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा

👤 फलटण प्रतिनिधी    📍 फलटण    🗓 23 Jul 2026 08:37 AM    👁 214 Views    ⏱️ 4 मिनिटे वाचन
मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा
कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील ३८ शेतकरी पात्र; उर्वरित याद्या लवकरच

**सातारा :** राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मुख्य पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यभरातील **५५३ पात्र शेतकऱ्यांचा** समावेश असून, त्यामध्ये **सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३८ शेतकऱ्यांची** नावे आहेत.

पहिल्या टप्प्यात ठाणे, लातूर, पुणे, अमरावती, सातारा आणि नागपूर या सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हानिहाय लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे –

* ठाणे : १८२
* लातूर : १३३
* पुणे : ८५
* अमरावती : ५८
* सातारा : ३८
* नागपूर : १६

सहकार विभागाच्या माहितीनुसार, कर्जमाफीची यादी जुलैच्या सुरुवातीलाच जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, शेतीव्यतिरिक्त इतर स्रोतांतून उत्पन्न मिळवून आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र सरकारकडून आयकराची माहिती मागविण्यात आली होती. तसेच २०१९ च्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आणि माहितीची पडताळणी यामुळे यादी जाहीर होण्यास काहीसा विलंब झाला.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने मुख्य पोर्टलवर अपलोड केल्या जाणार असून, त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या कर्जमाफी योजनेसाठी **३६,५८५ कोटी रुपयांची** तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे **५६ लाख शेतकरी कुटुंबांना** मिळणार असून, **२ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ** करण्यात येणार आहे. तसेच २०१९ च्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सुमारे **१२ लाख शेतकऱ्यांचाही** या योजनेत समावेश करण्यात आला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे **२३.६३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ** देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता पुढील याद्यांची प्रतीक्षा करावी, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या