📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र

बारामतीत अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्र सुरू; फिटनेस तपासणी आता अधिक पारदर्शक

👤 Kiran Nazirkar    📍 BARAMATI    🗓 22 Aug 2026 04:11 PM    👁 35 Views    ⏱️ 5 मिनिटे वाचन
बारामतीत अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्र सुरू; फिटनेस तपासणी आता अधिक पारदर्शक

📷 फोटो गॅलरी

बारामती :

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने बारामती एमआयडीसी परिसरात अत्याधुनिक व स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी अधिक शास्त्रशुद्ध, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे. वाहनांच्या तांत्रिक स्थितीची काटेकोर तपासणी करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यास या केंद्राची मदत होणार आहे.

या केंद्रामध्ये ब्रेक टेस्ट, हेडलाईट व प्रकाश व्यवस्थेची चाचणी, धूर व प्रदूषण तपासणी, सस्पेन्शन, स्टिअरिंग व चाकांची स्थिती, वाहनाचा वेग व तांत्रिक क्षमता तसेच वाहनाच्या बॉडीचे मोजमाप आदी तपासण्या अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेद्वारे केल्या जाणार आहेत. तसेच व्हर्च्युअल इन्स्पेक्शनच्या माध्यमातून वाहनातील विविध तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे.

केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत नियमांची पूर्तता करणाऱ्या १४० व्यावसायिक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार वाहन जप्तीची कारवाईही केली जाऊ शकते.

वाहन फिटनेस प्रमाणपत्रासाठी नियम

आठ वर्षांपर्यंतच्या व्यावसायिक वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र दर दोन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. आठ वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी दरवर्षी केली जाते. वैयक्तिक वाहनांची फिटनेस चाचणी १५ वर्षांनंतर नोंदणी नूतनीकरणाच्या वेळी केली जाते. त्यानंतर लागू नियमांनुसार दर पाच वर्षांनी नोंदणी नूतनीकरणासाठी संबंधित चाचणी केली जाते. वाहन तपासणीसाठी पूर्वनियोजित अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.

५ एकर क्षेत्रावर उभारले केंद्र

हे अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्र तब्बल ५ एकर क्षेत्रावर उभारण्यात आले असून, त्यासाठी सुमारे १३ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्वयंचलित उपकरणांमुळे तपासणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये पारदर्शकता वाढण्याबरोबरच तांत्रिक बिघाड असलेली वाहने रस्त्यावर येण्यास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून या केंद्राला मंजुरी मिळाली होती. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राचे काम वेळेत पूर्ण झाल्याचे सुरेंद्र निकम यांनी सांगितले.

बारामती परिसरातील वाढती वाहनसंख्या आणि व्यावसायिक वाहनांची सुरक्षितता लक्षात घेता हे केंद्र परिवहन व्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या